मराठी - नाग ( नागर ) पंचमी : कृतीमागील विचार
पार्श्वभूमी
वैदिक जीवन पद्धतीमध्ये वर्षभर अनेक सण-उत्सव साजरे केले जातात ज्यामध्ये अध्यात्मिक घटक प्रमुख आहे. त्यातीलच नाग पंचमी या सणाविषयी जाणून घेऊया. या दिवशी आपण पाहतो की, लोक नागाच्या पूजेसाठी जातात आणि नागाला नैवेद्य म्हणून दूध अर्पण करतात. काहीजण तर गारूड्यांना बोलावून लांब-लांब जाऊन बिचाऱ्या नागावर दूध ओततात. अशाप्रकारे नागपंचमी साजरी करणं कितपत योग्य आहे? या सगळ्यामागील अध्यात्मिक महत्त्व काय असू शकते?
उकल नागर(नाग)पंचमीची
प्रतिकात्मकता आणि संख्याशास्त्र हे घटक वैदिक सणात महत्त्वाचे ठरतात. नाग पंचमीला नागर पंचमी असे देखील म्हणतात. शब्द व्युत्पत्ति हे संस्कृत भाषेचं सौंदर्य आहे. नगर या शब्दाची फोड न+ग+र अशी होईल. “ग” म्हणजे “गति” जी अंतिम ठिकाण मोक्ष दर्शवते तर “र” म्हणजे “रमयति” जो आनंद दर्शवतो. म्हणजेच इथे मोक्षाकडे जाणारा आनंदपूर्ण प्रवास असा अर्थ प्रतीत होतो. पण यापुढे “न” हे अक्षर लावल्यामुळे नगर शब्द तयार होतो, ज्याचा अर्थ अशी जागा जिथे मोक्षाकडे जाणारा प्रवास आपल्याला आनंदपूर्ण नाही तर दुःखपूर्ण वाटतो. या धावपळीच्या नगरात राहताना आपले अध्यात्मिकतेकडे दुर्लक्ष होते. बहुतांश जणांना शहरापासून लांब शांत ठिकाणी गेल्यावर मनःशांति लाभते तसेच त्यांचा अध्यात्माकडे ओढा देखील वाढतो. कारण मनःशांती नंतरच एखादी गोष्ट श्रवण करतायेते व नंतर त्याचे मनन करता येते.
सरपटणारी शक्ती – अध्यात्मिक प्रतिकात्मकता
शहरात लाखो लोक रोज कष्ट करून वेगवेगळ्या प्रकारे शहाराच्या बांधणीत योगदान देतात. मुंग्यादेखील खूप कष्ट घेऊन वारूळ बांधतात पण ते बांधून पूर्ण झाले की, त्यात साप किंवा नाग येऊन राहायला लागतो.
इथे प्रतिकात्मकता लक्षात घ्यायला हवी. वैदिक पद्धतीप्रमाणे साप किंवा नाग ही सरपटणारी प्रजाती एका विशिष्ट शक्तीचे प्रतिक मानली गेली आहे. मग अशी कोणती शक्ती माणसे काम करणाऱ्या शहरात येते आणि राहते? ज्ञानेंद्रियांमधील कान हे इंद्रिय सापाला नाही. श्रवण करण्याची क्षमता त्यात नाही जी अध्यात्मिक साधनेत पहिली पायरी आहे. कर्मेंद्रियांपैकी पाय हे सापाला नाहीत. त्यामुळेच एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे हे त्याला अवघड जाते. अध्यात्मिक प्रवासातील निष्क्रियता हेच जणू यातून प्रतिकात्मक रितीने मांडले आहे.
नागाची हालचाल ही सरळ नसते. एका क्षणात तो एका दिशेने जाईल तर दुसऱ्या क्षणात दुसऱ्या दिशेला जाईल. सतत बदलणारे ध्येय आणि अस्पष्टता हे देखील यातून प्रतीत होते.
याबरोबरच साप कात टाकतो. एखादी इच्छा पूर्ण व्हावी म्हणून आपण रोज खूप काम करतो. ती इच्छा पूर्ण झाली की अजून एक इच्छा निर्माण होते. आपल्या गरजा आणि इच्छा जशा वाढतात तसे हे चक्र असेच सुरू राहते. पण काही काळानंतर आपण जेव्हा आयुष्याकडे मागे वळून पाहतो तेव्हा आपल्याला वाटतं की, आपण नको त्या गोष्टींवर खूप श्रम केले आहेत. त्यामुळे आता पुन्हा नव्याने सुरूवात करावी हे आपल्याला महत्त्वाचं वाटू लागतं. त्यामुळे अशा प्रतिकात्मकरितीच्या सरपटणाऱ्या शक्तीचा आपल्या आयुष्यातील वास खूप जणांना जाणवेल.
नागदेवतेला दूध का अर्पण करावे?
वेदग्रंथाप्रमाणे, देव या विश्वातील प्रत्येक गोष्टी देवता शक्तींमार्फत नियंत्रणात आणतो. सरपटणाऱ्या शक्ती ज्या उर्जा प्रदर्शित करतात त्यांची देवता नाग आहे.
वेदांमध्ये गाईला वेदमातेचे प्रतिक देऊन तिचे दूध हे शुद्ध वैदिक-अध्यात्मिक ज्ञान दर्शवते. म्हणूनच या नागपंचमी सणात शुद्ध अध्यात्मिक ज्ञानाचे प्रतिक असणारे दूध नाग देवतेला नैवेद्य म्हणून अर्पण केले जाते. सरपटणाऱ्या शक्तींच्या दोषांची तीव्रता कमी होवोत व तुमचे आशीर्वाद आमच्यावर राहोत असे निवेदन नाग देवतेकडे आजच्या दिवशी करत नाग पंचमी साजरी करायची असते.
तळटीप : हा लेख प्रोफेसर मुकुंद यांच्या नागपंचमी विषयावरील ध्वनीफितीतून वादिराज लिमये यांनी मराठीत भाषांतरित केला आहे.
Listen to the Marathi podcast of this article on soundcloud
https://soundcloud.com/jnyana/marathi-nag-panchami
Commenti